सिल्लोड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे तालुक्यातील एका लघु उद्योजकाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात व्यंकटेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स हा व्यवसाय यशस्वीपणे चालविणारे मंगेश खोंडे यांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अमृतच्या वैयक्तिक
व्याज परतावा योजनेसाठी अर्ज केला होता. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी त्यांना योजनेची सविस्तर माहिती देत योग्य मार्गदर्शन केले.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चिखली अर्बन बँक, सिल्लोड यांच्या माध्यमातून खोंडे यांना १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या कर्जाच्या सहाय्याने त्यांनी आपला व्यवसाय अधिक सक्षम व सुरळीतपणे सुरू ठेवत आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कर्जाचे सर्व हप्ते वेळेवर व नियमितपणे भरले आहे. या कर्जावर भरलेल्या व्याजापोटी ४४ हजार ४७० इतका व्याज परतावा थेट त्यांच्या बचत खात्यावर जमा झाला. रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करत अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांना याची माहिती दिली. त्यानंतर आपल्या दुकानात त्यांना आमंत्रित करून पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मंगेश खोंडे म्हणाले, की अमृत आणि अमृतच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, विशेषतः व्यवस्थापकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे माझ्यासारख्या छोठ्या व्यावसायिकांना मोठा आत्मविश्वास मिळतो. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व अमृत लक्षित गटातील व्यावसायिक, नवउद्योजक व नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. अमृतच्या विविध योजनांच्या माहितीसाठी योगेश रोडे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन या वेळी केले आहे.













